कबड्डी खेळाची माहिती मराठीमध्ये | Kabaddi Information In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला कबड्डी खेळाची माहिती मराठीमध्ये सांगणार आहे म्हणजेच Kabaddi Information In Marathi खोलवर स्पष्ट करणार आहे.

महाराष्ट्रात देखील मातीमध्ये खेळला जाणारा हा खेळ कधी मॅट पर्यंत पोहोचला हे कळालेच नाही! एखाद्या खेळाच्या बाबतीत झालेली ही सर्वात मोठी प्रगती म्हणावी लागेल. अगदी गाव पातळीवर खेळला जाणारा एखादा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तितक्याच उत्साहाने खेळला जात असेल तर मग तो आपल्या मातीतल्या खेळाचा जणू गौरवच असतो.

आज आपण याच कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कबड्डी हा असा खेळ आहे ज्यामध्ये कुस्ती, रग्बी सारख्या खेळांचे एकत्रित मिश्रण आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला कबड्डी खेळाचा इतिहास, कबड्डी खेळाचे नियम, कबड्डी कशी खेळतात, कबड्डी खेळातील स्पर्धा (History of Kabaddi, Rules of Kabaddi, How to Play Kabaddi, Events and Cups in Kabaddi) यांविषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे.

कबड्डी खेळाचा इतिहास – History Of Kabaddi In Marathi

कबड्डीची सुरुवात ही प्राचीन भारतात झाली असावी असे समजले जाते. तामिळनाडू राज्यातून या खेळाचा उगम झाला असावा. कबड्डी या खेळाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते त्यामुळे या खेळाला सार्वत्रिक असे नाव कबड्डी देण्यात आले आहे. तमिळ शब्द असलेल्या ‘काई-पिडी’ वरून कबड्डी शब्दाची निर्मिती झाली आहे. काई-पीडी या शब्दाचा अर्थ म्हणजे एकमेकांचा हाथ पकडून ठेवणे. हाच कबड्डी शब्द पुढे जाऊन उत्तर भारतात आणि आता संपूर्ण जगात लोकप्रिय बनला आहे.

भारतातून सुरू झालेल्या या खेळाला जगातील स्तरावर नावलौकिक हा 1936 मध्ये झालेल्या बर्लिन ऑलम्पिक मध्ये मिळाला. आपला खेळ जगात लोकप्रिय होत आहे हे बघून 1938 मध्ये कबड्डी खेळाला राष्ट्रीय खेळांच्या यादीमध्ये सन्मानित करण्यात आले. त्या काळात जरी भारत स्वतंत्र झालेला नसला तरी देखील हीच यादी पुढे स्वातंत्र्यानंतर देखील कायम ठेवण्यात आली आहे. 1950 साली अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन ची स्थापना करण्यात आली. याच संघटनेने कबड्डी विषयक सर्व नियम घालून दिले आहेत. ही संघटना काही काळ याच नावाने कार्यरत राहिली परंतु पुढे जाऊन 1972 साली याच संघटनेची पुनरउभारणी करून तिला ‘अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ अस नाव देण्यात आले.

भारतासोबत जपान सारख्या देशात देखील कबड्डी खेळाला खूप जास्त लोकप्रियता लाभलेली आहे. 1979 साली अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन चे सुंदर राम यांनी जपान मध्ये लोकांच्या समोर कबड्डी या खेळाला मांडले. आशिया खंडात या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा त्यांचा हेतू होता. त्यांनी जपान मध्ये खेळाचा प्रसार केला आणि त्यांना अनेक खेळाडू आणि जपानी नागरिक मिळाले ज्यांनी या खेळाविषयी रुची दाखविली.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना जर म्हणले तर भारत आणि बांग्लादेश या दोन संघाच्या दरम्यान 1979 साली भारतात कबड्डीचा पहिला सामना खेळविला गेला. पुढील वर्षी लगेच म्हणजे 1980 मध्ये कबड्डी साठी आशियाई कप ची सुरुवात केली गेली. यामध्ये भारत, बांग्लादेश, जपान, नेपाळ आणि मलेशिया हे संघ शामिल झाले होते. पहिल्याच आशियाई चॅम्पियनशीप कप मध्ये भारताने अंतिम सामन्यात बांग्लादेश संघाला हवरून विजेतेपद मिळविले. 1990 साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये देखील आता कबड्डीला स्थान मिळाले होते. या पातळीवर अनेक इतर देश देखील हा खेळ खेळायला लागले होते.

कबड्डी कशी खेळतात – How To Play Kabaddi In Marathi

Kabaddi Information In Marathi
Kabaddi Khelachi Mahiti

कबड्डी हा खेळ दोन संघाच्या दरम्यान खेळला जाणारा खेळ आहे. खेळ तसा आधी मैदानी होता परंतु त्याचे स्वरूप बदलत आता तो मातीवरून मॅट वर गेला असल्याने त्याला इंडोर खेळांचे रूप आले आहे. या खेळात प्रत्येक संघात जास्तीत जास्त 12 खेळाडू असतात. यात एक संघ हा आक्रमक संघ असतो तर दुसरा संघ हा रक्षक संघ असतो. यामध्ये आक्रमक असणाऱ्या संघाला एक खेळाडू घेऊन दुसऱ्या रक्षक संघावर आक्रमण करायचे असते. यामध्ये प्रत्येक संघ हा आक्रमक आणि रक्षक संघ अशा दोन्ही भूमिका बजावत असतो.

एका संघात जास्तीत जास्त 12 खेळाडू जरी असले तरी मैदानावर 7 खेळाडू असतात. आपण बाकी गोष्टी जाणून घेण्याच्या आधी कबड्डी खेळाच्या मैदानाविषयी माहिती जाणून घेऊयात.

कबड्डी खेळाचे मैदान – Kabaddi Ground Information In Marathi

कबड्डी हा खेळ पुरुष आणि महिला दोघेही खेळतात, त्यामुळे या खेळाचे मैदान हे पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या मापाचे असते. कबड्डी हा खेळ आता मॅट वर खेळला जात आहे परंतु जेव्हा तो मैदानावर खेळला जायचा तेव्हा त्याचे मैदान हे समतल आणि नरम आहे की नाही या गोष्टी तपासल्या जायच्या. साधारणतः कबड्डीचा मैदानाची लांबी ही 12.50 मीटर तर रुंदी ही 10 मीटर इतकी असते. वजन गटावर देखील मैदानाची लांबी रुंदी अवलंबून असते. जर 50 किलोपेक्षा कमी वजन गटात मॅच होणार असेल तर मैदानाची लांबी ही 11 मीटर तर रुंदी 8 मीटर इतकी असते. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे मैदानाचे माप आहेत. यात राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या खेळांमध्ये थोडेफार बदल हे होत असतात.

कबड्डी खेळाचे मैदान हे दोन विभागात विभागले जाते. 7 खेळाडू मैदानात असतात आणि 1 अतिरिक्त खेळाडू हा देखील प्रत्येक संघाकडे असतो. संघाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणले जाते. पुरुषांसाठी हा खेळ 40 मिनिटांचा असतो तर महिलांसाठी हा खेळ 30 मिनिटांचा असतो. यामध्ये पुरुषांना 20 मिनिटे झाल्यावर आणि महिलांना 15 मिनिटे झाल्यावर 5 मिनिटांचा हाफ टाईम मिळत असतो. या हाफ टाईमच्या दरम्यान दोन्ही संघांना त्यांचा कोर्ट बदलावा लागतो.

कबड्डी खेळात आक्रमण करणारा संघ हा रक्षक संघाच्या कोर्ट मध्ये जातो. त्याला जाताना कबड्डी-कबड्डी हे म्हणत राहावे लागते. जर आक्रमण करणाऱ्या खेळाडूने रक्षण करणाऱ्या संघाच्या एक किंवा त्याहून अधिक खेळाडूंना हात लावून किंवा स्पर्श करून श्वास न तुटता पुन्हा स्वतःच्या संघाच्या मैदानात प्रवेश केला तर त्याने जितक्या खेळाडूंना स्पर्श केलेला होता ते बाद होतात व आक्रमण करणाऱ्या संघाला तितके पॉईंट्स मिळतात. आक्रमण करणाऱ्या खेळाडूला श्वास सोडत असताना कबड्डी कबड्डी पुटपुटत राहायचे असते. जर समजा त्या खेळाडूचा श्वास हा रक्षक दलात असताना तुटला आणि तो खेळाडू आपल्या संघात पोहोचू शकला नाही तर मग मात्र तो खेळाडू बाद घोषित केला जातो. रक्षक संघाला त्याच्या बदल्यात एक पॉईंट देखील मिळत असतो.

आक्रमण सुरू असताना रक्षक दलातील खेळाडू हे कोणत्याही कारणाने मधली रेषा पार करून जाऊ शकत नाहीत. जर एखादा चुकून गेला तर तो बाद दिला जातो. रक्षक दलाच्या कोर्ट मध्ये एक आणखी रेषा आखलेली असते. त्या रेषेच्या आत जर आक्रमण करणाऱ्या खेळाडूने पाय ठेवला किंवा स्पर्श केला तर आक्रमण करणारा खेळाडू हा श्वास सोडू शकतो. त्याला श्वास सोडण्याविषयी काही बंधन रहात नाही.

जे खेळाडू बाद होतात त्यांना काही काळ मैदानाच्या बाहेर बसावे लागते. जेव्हा एक संघ दुसऱ्या संघाच्या एखाद्या खेळाडूला बाद करतो तेव्हा त्या संघाला एक पॉईंट मिळत असतो. जर अशावेळी त्या संघाचा एखादा खेळाडू आधीच बाद असेल तर पॉईंट सोबत तो खेळाडू देखील पुन्हा मैदानात येतो. जेव्हा एखादा संघ विरोधी संघाला पूर्णपणे बाद करत असेल तेव्हा त्या संघाला 2 पॉईंट्स जास्त मिळतात.

20-20 मिनिटांचे 2 हाफ झाल्यानंतर ज्या संघावर गुण म्हणजे पॉईंट्स सर्वात जास्त असतात तो संघ विजेता म्हणून घोषित केला जातो. सामना जर निर्णायक नसेल तर तो तसाच ठेवला जातो परंतु अंतिम किंवा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांमध्ये काही मिनिटांचा एक्स्ट्रा टाईम देखील खेळवला जातो.

मैदानातील सदस्य – Kabaddi Ground Members In Marathi

कबड्डी खेळात त्या 7 आणि 7 अशा चौदा खेळाडूंच्या व्यतिरिक्त आणखी काही सदस्य देखील असतात. यात एक रेफरी, दोन पंच (अंपायर), एक स्कोअरर आणि त्याला मदतीसाठी 2 असिस्टंट स्कोअरर देखील असतात.

कबड्डी खेळाचे नियम – Kabaddi Rules In Marathi

वर सांगितल्या प्रमाणे अंक किंवा पॉइंट मिळविण्यासाठी खेळाडूला श्वास रोखून ठेवावा लागतो. आणि त्याला श्वास सोडताना कबड्डी कबड्डी असे उच्चारावे लागते.

इंग्रजी मध्ये सांगायचे झाले तर आक्रमणाला रेड असे म्हणतात आणि जो आक्रमण करतो त्याला रेडर असे संबोधले जाते. 40 मिनिटांच्या काळात प्रत्येक संघाला जवळपास समान अशा एकानंतर एक रेड करण्याच्या संधी मिळत असतात.

एका रेडचा कालावधी हा 30 सेकंदाचा असतो. यामध्ये रेडरला आणि रक्षण करणाऱ्या संघाला गुण मिळवण्यासाठी समान संधी असतात.

कबड्डी या खेळाचे आणखी काही नियम आहे त्यात बोनस पॉईंट ही संकल्पना येते. त्यामुळे एक खेळाडू हा बोनस पॉईंट आणि त्यासोबत रेड पॉईंट्स (टच पॉईंट्स) दोन्ही मिळवू शकतो.

कबड्डी खेळात कोणत्याही खेळाडूला रेड सुरू असताना कोर्ट च्या बाहेर जाता येत नाही. तसे घडल्यास तो खेळाडू बाद दिला जातो आणि प्रतिस्पर्धी संघाला एक पॉईंट बोनस म्हणून मिळतो.

कबड्डी खेळातील पॉईंट मिळविण्याच्या पद्धती – Point System Or Scoring System In Kabaddi

कबड्डी खेळात खालील प्रकारे पॉईंट्स हे मिळत असतात-

टच पॉईंट – टच पॉईंट्स म्हणजे जेव्हा रेडर म्हणजे आक्रमण करणार खेळाडू हा रक्षक दलातील खेळाडूंना स्पर्श करून स्वतःच्या मैदानात परत येतो तेव्हा त्याने जितक्या खेळाडूंना स्पर्श केला आहे त्या खेळाडूंच्या संख्येइतके पॉईंट्स आक्रमक संघाला दिले जातात. यामध्ये ज्या खेळाडूंना स्पर्श झाला आहे असे खेळाडू बाद होतात आणि त्यांना बाहेर बसावे लागते.

बोनस पॉईंट्स – रक्षक दलामध्ये 6 किंवा 6 पेक्षा जास्त खेळाडू असतील आणि आक्रमण करणाऱ्या खेळाडूने जर अशा स्थितीत बोनस लाईनला स्पर्श केला तर त्याला बोनस पॉईंट दिला जातो.

डु ऑर डाय रेड – जेव्हा एखाद्या संघाने मागील दोन रेड मध्ये एकही पॉईंट मिळविला नसला तर मग त्या संघाला येणाऱ्या 3ऱ्या रेड मध्ये बोनस पॉईंट किंवा टच पॉईंट काहीतरी एक मिळवावाच लागतो. जर असे झाले नाही तर मग प्रतिस्पर्धी रक्षण करणाऱ्या संघाला एक पॉईंट हा मिळतो.

सुपर रेड – बोनस किंवा टच सर्व काही मिळून जेवहा रेडर हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक पॉईंट्स मिळवत असेल तेव्हा त्या रेडला सुपर रेड म्हणून ओळखले जाते. यामध्ये कोणताही एक्स्ट्रा पॉईंट हा मिळत नाही.

टॅकल पॉईंट – टॅकल पॉईंट हा रक्षक दलाला मिळणारा पॉईंट आहे. जर एका किंवा अधिक रक्षक दलातील खेळाडूंनी आक्रमण करणाऱ्या खेळाडूला श्वास तुटेपर्यंत किंवा 30 सेकंद रोखून धरले तर रक्षक दलाला एक पॉईंट मिळतो. टॅकल पॉईंट मध्ये पकडला गेलेला रेडर हा देखील बाद होऊन मैदानाबाहेर जात असतो.

सुपर टॅकल – रक्षण करणाऱ्या संघात जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू शिल्लक असतात आणि अशा वेळी जर त्यांनी आक्रमण करणाऱ्या खेळाडूला टॅकल केले तर मग त्याला सुपर टॅकल म्हणले जाते. यात रक्षण करणाऱ्या दलाला एक अतिरिक्त पॉईंट देखील मिळत असतो.

ऑल आऊट – जर एखाद्या संघाने प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद केले तर त्या संघाला 2 अतिरिक्त पॉईंट्स मिळत असतात. यांना बोनस पॉईंट्स च म्हणले जाते.

कबड्डी स्पर्धा – Events Of Kabaddi

प्रो कबड्डी लीग – या लीगने भारतात कबड्डी खेळाविषयी आणखी लोकप्रियता वाढविली आहे.

एशियन गेम्स – 1990 सालापासून आशियाई खेळांमध्ये देखील कबड्डी खेळला स्थान मिळाले आहे.

वर्ल्ड कप – या स्पर्धेत जगातील अनेक देशातील संघ भाग घेतात. प्रथम स्पर्धा 2004 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

निष्कर्ष

कबड्डी खेळ हा संपूर्ण अंग मोकळे करण्याचा खेळ आहे ज्यात खेळाडूचे शरीर तंदुरुस्त, लवचिक आणि मजबूत असते. जर आपल्याला कबड्डी खेळण्याची संधी प्राप्त झाली तर आपण ही संधी नक्कीच घ्यायला हवी. बहुतेक वेळा शाळेत विद्यार्थ्यांना ह्या खेळाविषयी माहिती विचारली जाते तर हा आपल्यासाठी उपयोगी ठरेल.

कबड्डी या खेळाविषयी संपूर्ण माहिती (Kabaddi Information in Marathi) देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. याशिवाय तुम्हाला कबड्डी खेळाविषयी काही माहिती असेल तर ती देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap